Tuesday, October 27

खाऊच्या पैशांपासून बँक खात्यापर्यंत! पंढरपूर अर्बन बँकेने विद्यार्थ्यांना दिला आर्थिक शिस्तीचा धडा

दहा वर्षे व त्यावरील विद्यार्थ्यांना स्वतःच्या सहीने बँक खाते उघडण्याची संधी उपलब्ध करून देणे,त्यांना आर्थिक व्यवहारांची ओळख करून देणे आणि बचतीचे महत्त्व पटवून देणे हा या अभियाना मागील प्रमुख उद्देश आहे. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता प्रत्यक्ष जीवनात उपयोगी पडणारे आर्थिक व्यवहारज्ञान देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटन पंढरपूर अर्बन बँकेचे चेअरमन सतीश मुळे, संचालक अनिल अभंगराव,मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश विरधे, कर्मयोगी संकुलाचे रजिस्ट्रार गणेश वाळके आणि कर्मयोगी विद्यानिकेतनच्या प्राचार्या प्रियदर्शनी सरदेसाई यांच्या हस्ते झाले.यावेळी बँकेचे पदाधिकारी, शैक्षणिक संकुलातील मान्यवर, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात कर्मयोगी विद्यानिकेतनच्या प्राचार्या प्रियदर्शनी सरदेसाई यांनी विद्यार्थ्यां च्या सर्वांगीण विकासासाठी आर्थिक साक्षरतेचे महत्त्व स्पष्ट केले.शालेय शिक्षणातून विविध विषयांचे ज्ञान मिळते; मात्र दैनंदिन जीवनात पैशांचे नियोजन कसे करावे, बचत का करावी आणि आर्थिक व्यवहार कसे समजून घ्यावेत, याचे ज्ञानही विद्यार्थ्यांना मिळणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

खाऊसाठी मिळणाऱ्या पैशांमधून काही रक्कम बाजूला ठेवण्याची सवय विद्यार्थ्यांनी लावून घ्यावी. आज केलेली छोटी बचत भविष्या तील गरजा पूर्ण करण्यासाठी उपयोगी पडू शकते. स्वतःच्या सहीने बँक खाते उघडण्याची संधी विद्यार्थ्यांना आर्थिक जबाबदारीची जाणीव करून देईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

पंढरपूर अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश विरधे यांनी विद्यार्थ्यांना नियमित बचतीचे महत्त्व पटवून दिले.छोटी बचत ही भविष्यातील स्वप्नांची नांदी आहे, असे सांगत त्यांनी बचतीची सवय ही आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल असल्याचे स्पष्ट केले.

नियमितपणे केलेली छोटी बचत कालांतराने मोठा आर्थिक आधार निर्माण करू शकते. प्रत्येक मोठ्या यशाची सुरुवात छोट्या पावलाने होते. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी लहान वयातच बचतीची सवय लावून घेतल्यास भविष्यातील आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी त्यांना मदत होऊ शकते,असे उमेश विरधे म्हणाले.

बँक खाते हे केवळ पैसे जमा करण्याचे साधन नाही, तर आर्थिक शिस्त, जबाबदारी आणि स्वावलंबन शिकण्याचे माध्यम आहे. विद्यार्थ्यांना आधुनिक बँकिंग व्यवस्थेची ओळख करून देणे आणि आर्थिक व्यवहारांबाबत जागरूकता निर्माण करणे, हा या अभियानाचा उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले.

IMG-20261018-WA0019


पंढरपूर अर्बन बँकेचे चेअरमन सतीश मुळे यांनी सांगितले की, कुटुंबप्रमुख माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली बँक सातत्याने प्रगती करीत आहे. ग्राहकाभिमुख सेवा,आर्थिक शिस्त आणि समाजातील विविध घटकां पर्यंत बँकिंग सेवा पोहोचविण्याला बँकेने प्राधान्य दिले आहे.विद्यार्थी हे देशाचे भविष्य असून आजचे विद्यार्थी उद्याचे जबाबदार नागरिक आहेत. लहान वयातच बँकिंग व्यवहारांची माहिती मिळाल्यास त्यांच्यामध्ये आर्थिक नियोजनाची क्षमता विकसित होऊ शकते. स्वतःच्या सहीने खाते उघडण्याच्या या अभियानामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबनाची जाणीव निर्माण होऊन आर्थिक साक्षरतेचा पाया मजबूत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.बँकिंग सेवा समाजातील सर्व स्तरांपर्यंत पोहोचविण्यासोबत विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक जागरूकता निर्माण करणे ही बँकेची सामाजिक बांधिलकी असल्याचेही चेअरमन सतीश मुळे यांनी सांगितले.

या अभियानांतर्गत बचत खाते उघडलेल्या विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात पिगी बँक आणि खाऊचे वाटप करण्यात आले.पिगी बँकेच्या माध्यमातून दररोज किंवा नियमितपणे थोडी रक्कम साठवण्याची सवय विद्यार्थ्यांना लागावी,हा या उपक्रमा मागील सकारात्मक संदेश आहे.

लहान वयात पैशांचे महत्त्व समजणे,गरज आणि इच्छा यांतील फरक ओळखणे,अनावश्यक खर्च टाळणे आणि भविष्यासाठी बचत करणे या सवयी विद्यार्थ्यांच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. बँक खाते आणि प्रत्यक्ष बचतीचा अनुभव मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांचा आर्थिक व्यवहारांकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक जबाबदार होण्यास मदत होऊ शकते.

आजच्या डिजिटल युगात ऑनलाइन पेमेंट,बँकिंग व्यवहार, बचत आणि आर्थिक नियोजन यांची माहिती असणे आवश्यक बनले आहे. त्यामुळे आर्थिक साक्षरता ही केवळ प्रौढांसाठीची गरज राहिलेली नाही.विद्यार्थ्यांना योग्य वयात आर्थिक व्यवहारांची प्राथमिक माहिती मिळाल्यास भविष्यात आर्थिक निर्णय घेताना त्यांचा आत्मविश्वास वाढू शकतो.

पंढरपूर अर्बन बँकेचा हा उपक्रम विद्यार्थ्यांना बँकिंग व्यवस्थेशी जोडण्याबरोबरच बचतीचे महत्त्व प्रत्यक्ष कृतीतून शिकविण्याचा प्रयत्न आहे. शैक्षणिक संस्थांच्या सहकार्याने असे उपक्रम राबविल्यास विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक शिस्त रुजविण्यास मदत होऊ शकते.

कार्यक्रमादरम्यान पंढरपूर अर्बन बँकेचे चेअरमन सतीश मुळे, संचालक अनिल अभंगराव आणि मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश विरधे यांचा सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भोसले सर यांनी केले.हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी पंढरपूर अर्बन बँकेचे सेवक आणि कर्मयोगी विद्यानिकेतनमधील शिक्षकवर्गाने परिश्रम घेतले.

खाऊच्या पैशांतून बचत, बचतीतून आर्थिक शिस्त आणि आर्थिक शिस्तीतून स्वावलंबन हा संदेश देणारा पंढरपूर अर्बन बँकेचा उपक्रम विद्यार्थ्यांच्या आर्थिक साक्षरतेच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *