
संगमनेरच्या साकुर-बोटा-पठार भागात एमआयडीसीसाठी हालचालींना वेग; सर्वेक्षण तातडीने पूर्ण करण्याची आमदार सत्यजीत तांबे यांची मागणी
संगमनेर तालुक्यातील साकुर- बोटा -पठार भागात प्रस्तावित एमआयडीसीचे सर्वेक्षण लवकर पूर्ण करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी,अशी मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी केली.सहकारी औद्योगिक वसाहतीतील प्रश्न सोडविण्यासाठीही उद्योग विभागा कडे पाठपुरावा.
संगमनेर | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३० सप्टेंबर २०२६ :संगमनेर तालुक्यात औद्योगिक विकासाला चालना देऊन रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्यासाठी आमदार सत्यजीत तांबे यांनी एमआयडीसी प्रशासन आणि उद्योग विभागाकडे पाठपुरावा सुरू ठेवला आहे. साकुर -बोटा-पठार भागातील प्रस्तावित एमआयडीसीसाठीचे सर्वेक्षण लवकरात लवकर पूर्ण करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
मंगळवार दि. २९ सप्टेंबर रोजी मुंबई येथे एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील संबंधित अधिकाऱ्यां सोबत बैठक झाली. या बैठकीत साकुर पठार भागातील प्रस्तावित एमआयडीसी, आवश्यक पाणीपुरवठा नियोजन आणि औद्योगिक विकासासाठी आवश्यक पायाभूत सुविधांबाबत चर्चा करण्यात आली.

सर्वेक्षणाला गती देण्याची मागणी
साकुर, बोटा आणि पठार परिसरात एमआयडीसी उभारण्यासाठी आवश्यक असलेले सर्वेक्षण आणि प्रशासकीय प्रक्रिया तातडीने पूर्ण करून पुढील कार्यवाहीला गती द्यावी, अशी भूमिका आमदार सत्यजीत तांबे यांनी बैठकीत मांडली. एमआयडीसीच्या माध्यमातून या भागात उद्योग उभे राहिल्यास स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होण्यास मदत होऊ शकते.
या औद्योगिक वसाहतीसाठी पाणीपुरवठ्याचे योग्य आणि दीर्घकालीन नियोजन करणे आवश्यक असल्याचेही तांबे यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.
सहकारी औद्योगिक वसाहतीत १८० व्यवसाय
संगमनेर तालुक्यातील सहकारी औद्योगिक वसाहतीमध्ये सुमारे १८० विविध व्यवसाय सुरू असून, त्यातून सुमारे ५ हजार नागरिकांना रोजगार मिळत असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले.या औद्योगिक वसाहतीसमोरील विविध प्रश्न सोडविण्यासाठी उद्योग विभागाने तातडीने सहकार्य करावे, अशी मागणीही आमदार तांबे यांनी केली.
संगमनेर तालुक्याचा औद्योगिक विस्तार वाढविण्यासाठी शासकीय एमआयडीसी उभारण्याची मागणी लोकनेते बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजीत तांबे यांच्या माध्यमातून सातत्याने करण्यात येत आहे.
ग्रामीण भागातील औद्योगिकी करणावर भर
संगमनेर तालुका भौगोलिकदृष्ट्या पठार भाग, प्रवरा पट्टा आणि तळेगाव भाग अशा विविध क्षेत्रांमध्ये विस्तारलेला आहे. शिक्षण, दूध व्यवसाय, सहकार आणि ग्रामीण विकासाच्या माध्यमातून तालुक्यात आर्थिक उपक्रमांना चालना मिळाली आहे. आता औद्योगिक क्षेत्राचा विस्तार करून ग्रामीण भागातील युवकांना स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे.
एमआयडीसीचे सर्वेक्षण, पायाभूत सुविधांचे नियोजन आणि प्रशासकीय प्रक्रिया यांना गती मिळाल्यास प्रस्तावित औद्योगिक वसाहतीच्या पुढील कामाला चालना मिळू शकते. तसेच संगमनेर सहकारी औद्योगिक वसाहतीतील प्रलंबित प्रश्नांवरही उद्योग विभागाकडून आवश्यक कार्यवाही करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
बैठकीदरम्यान एमआयडीसीच्या प्रस्तावित कामाला गती देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याची माहिती देण्यात आली.
