Thursday, October 29

ओला-उबेरच्या भाडेवाढीला आणि महिला प्रवाशांच्या अडवणुकीला चाप बसणार ? आमदार डॉ.नीलम गोऱ्हे आक्रमक; तक्रारींसाठी स्वतंत्र क्रमांक

डॉ.गोऱ्हे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत परिवहनमंत्री प्रताप सरनाईक आणि सचिव राजेश नार्वेकर यांच्याशी चर्चा केली. प्रवाशांच्या तक्रारींच्या अनुषंगाने शक्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिल्याचे डॉ.नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

पुण्यातील काही महिला प्रवाशांनी, त्यामध्ये एका महिला पत्रकाराचाही समावेश आहे, रात्रीच्या वेळी ओला सेवेतून प्रवास करताना आलेल्या अडचणी डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या कडे मांडल्या.ॲपवर दर्शविलेल्या भाड्यानुसार प्रवास बुक केल्यानंतर काही चालकांनी मीटरनुसार पैसे देण्याचा आग्रह धरल्याचे या महिलांनी सांगितले.बुकिंगच्या वेळी दर्शविलेल्या भाड्यानुसारच पैसे देण्याची भूमिका घेतल्यानंतर काही महिलांना वाहनातून उतरवण्यात आल्याच्या तक्रारीही प्राप्त झाल्या आहेत.

भाड्यावरून निर्माण होणारा वाद हा केवळ आर्थिक प्रश्न नसून, विशेषतः रात्रीच्या वेळी महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेशी संबंधित गंभीर विषय असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी अधोरेखित केले. अशा घटनांची चौकशी करून प्रवाशांना दिलासा देणारा तोडगा काढणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

अशा प्रकारच्या तक्रारी नोंदवण्यासाठी ८२७५३३०१०१ हा स्वतंत्र संपर्क क्रमांक उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली.

महिला आणि पुरुष अशा दोन्ही प्रवाशांनी अतिरिक्त भाड्याची मागणी, गैरवर्तन किंवा वाहनातून उतरवून देण्यासारखी घटना घडल्यास तक्रार करण्याचे आवाहन त्यांनी केले.

तक्रार अधिक स्पष्ट आणि तपासासाठी उपयुक्त ठरण्यासाठी प्रवाशांनी पुढील माहिती द्यावी:

  • वाहनाचा नोंदणी क्रमांक.
  • घटनेची तारीख आणि वेळ.
  • प्रवासाचे ठिकाण आणि मार्ग.
  • ॲपवरील बुकिंगचा तपशील.
  • दर्शविलेले भाडे आणि प्रत्यक्ष मागितलेली रक्कम.
  • उपलब्ध असल्यास बुकिंग व भाड्याचे स्क्रीनशॉट आणि संबंधित संदेश.

प्रवाशांनी संबंधित आरटीओकडे तक्रार नोंदवण्याबरोबरच डॉ. गोऱ्हे यांच्या कार्यालयाकडेही लेखी तक्रारी द्याव्यात,असे आवाहन करण्यात आले आहे.प्राप्त तक्रारींच्या आधारे संबंधित ॲप आधारित वाहनसेवा कंपन्यांचे प्रतिनिधी आणि परिवहन विभाग यांच्यासोबत बैठक घेऊन भाड्यातील तफावत, प्रवाशांची अडवणूक आणि चालक-प्रवासी यांच्यातील वाद यांवर तोडगा काढण्यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे.

या संपूर्ण प्रकरणात महिला प्रवाशांनी भीतीपोटी तक्रार करण्याचे टाळू नये यावर डॉ.नीलम गोऱ्हे यांनी विशेष भर दिला आहे. तक्रारदार महिलांची नावे गोपनीय ठेवली जातील आणि त्यांच्या तक्रारींच्या निवारणासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

रात्रीच्या वेळी महिला प्रवाशांना वाहनातून उतरवणे ही त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने गंभीर बाब आहे.महिलांनी न घाबरता आपल्या तक्रारी लेखी स्वरूपात द्याव्यात. तक्रारदार महिलांची नावे गोपनीय ठेवली जातील आणि त्यांच्या तक्रारींच्या निवारणासाठी प्रयत्न केले जातील,असे आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.

ॲपवर बुकिंग करताना दिसणारे भाडे, प्रत्यक्ष प्रवासाच्या वेळी होणारी मागणी आणि चालकाचे वर्तन याबाबत काही तफावत किंवा वाद निर्माण झाल्यास त्याची नोंद ठेवणे महत्त्वाचे आहे.स्क्रीनशॉट आणि बुकिंगची माहिती जतन करून संबंधित यंत्रणेकडे तक्रार केल्यास प्रकरणाची पडताळणी करण्यास मदत होऊ शकते.

ॲपआधारित वाहनसेवा वापरणाऱ्या प्रवाशांना सुरक्षित, पारदर्शक आणि सन्मानपूर्वक सेवा मिळावी, यासाठी तक्रारींची दखल घेणे आणि त्यावर योग्य कार्यवाही करणे आवश्यक आहे. आता डॉ. गोऱ्हे यांच्या पुढाकारानंतर संबंधित परिवहन यंत्रणा आणि कंपन्या या तक्रारींवर कोणती पावले उचलतात, याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *