
ओला-उबेरमध्ये भाड्यावरून वाद, महिलांना रात्री उतरवले? डॉ.नीलम गोऱ्हे यांचे आवाहन; तक्रारींसाठी नंबर जाहीर
ओला, उबेरसह ॲपआधारित वाहनसेवांमध्ये अतिरिक्त भाड्याची मागणी, महिला प्रवाशांशी गैरवर्तन किंवा रात्री वाहनातून उतरवून देण्याच्या प्रकारांविरोधात तक्रार करा, असे आवाहन डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले आहे. तक्रारदार महिलांची नावे गोपनीय ठेवण्यात येणार असून तक्रारीसाठी ८२७५३३०१०१ हा संपर्क क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे.
ओला-उबेर चालकांकडून अतिरिक्त भाड्याची मागणी?महिलांनो घाबरू नका; तक्रार करा
पुणे | ज्ञानप्रवाह न्यूज :ॲपवर एक भाडे दाखवायचे आणि प्रत्यक्ष प्रवासाच्या वेळी वेगळ्याच रकमेची मागणी करायची, पैसे देण्यावरून वाद घालायचा किंवा महिला प्रवाशांना रात्रीच्या वेळी वाहनातून उतरवून द्यायचे,अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी आता तक्रारींचा आवाज बुलंद करण्याचे आवाहन शिवसेना नेत्या, महाराष्ट्र विधान परिषदेच्या सदस्या तथा माजी उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केले आहे.ओला,उबेर आणि अन्य ॲपआधारित वाहनसेवांमध्ये अतिरिक्त भाड्याची मागणी किंवा गैरवर्तन झाल्यास संबंधित प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे (आरटीओ) तक्रार करण्याचे आवाहन त्यांनी केले.
डॉ.गोऱ्हे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत परिवहनमंत्री प्रताप सरनाईक आणि सचिव राजेश नार्वेकर यांच्याशी चर्चा केली. प्रवाशांच्या तक्रारींच्या अनुषंगाने शक्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिल्याचे डॉ.नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.
ॲपवर वेगळे भाडे,प्रत्यक्षात वेगळी मागणी
पुण्यातील काही महिला प्रवाशांनी, त्यामध्ये एका महिला पत्रकाराचाही समावेश आहे, रात्रीच्या वेळी ओला सेवेतून प्रवास करताना आलेल्या अडचणी डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या कडे मांडल्या.ॲपवर दर्शविलेल्या भाड्यानुसार प्रवास बुक केल्यानंतर काही चालकांनी मीटरनुसार पैसे देण्याचा आग्रह धरल्याचे या महिलांनी सांगितले.बुकिंगच्या वेळी दर्शविलेल्या भाड्यानुसारच पैसे देण्याची भूमिका घेतल्यानंतर काही महिलांना वाहनातून उतरवण्यात आल्याच्या तक्रारीही प्राप्त झाल्या आहेत.
भाड्यावरून निर्माण होणारा वाद हा केवळ आर्थिक प्रश्न नसून, विशेषतः रात्रीच्या वेळी महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेशी संबंधित गंभीर विषय असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी अधोरेखित केले. अशा घटनांची चौकशी करून प्रवाशांना दिलासा देणारा तोडगा काढणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
तक्रारींसाठी स्वतंत्र संपर्क क्रमांक
अशा प्रकारच्या तक्रारी नोंदवण्यासाठी ८२७५३३०१०१ हा स्वतंत्र संपर्क क्रमांक उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली.
महिला आणि पुरुष अशा दोन्ही प्रवाशांनी अतिरिक्त भाड्याची मागणी, गैरवर्तन किंवा वाहनातून उतरवून देण्यासारखी घटना घडल्यास तक्रार करण्याचे आवाहन त्यांनी केले.
तक्रार अधिक स्पष्ट आणि तपासासाठी उपयुक्त ठरण्यासाठी प्रवाशांनी पुढील माहिती द्यावी:
- वाहनाचा नोंदणी क्रमांक.
- घटनेची तारीख आणि वेळ.
- प्रवासाचे ठिकाण आणि मार्ग.
- ॲपवरील बुकिंगचा तपशील.
- दर्शविलेले भाडे आणि प्रत्यक्ष मागितलेली रक्कम.
- उपलब्ध असल्यास बुकिंग व भाड्याचे स्क्रीनशॉट आणि संबंधित संदेश.
आरटीओकडे तक्रार करा; कंपन्यांनाही जाब विचारा!
प्रवाशांनी संबंधित आरटीओकडे तक्रार नोंदवण्याबरोबरच डॉ. गोऱ्हे यांच्या कार्यालयाकडेही लेखी तक्रारी द्याव्यात,असे आवाहन करण्यात आले आहे.प्राप्त तक्रारींच्या आधारे संबंधित ॲप आधारित वाहनसेवा कंपन्यांचे प्रतिनिधी आणि परिवहन विभाग यांच्यासोबत बैठक घेऊन भाड्यातील तफावत, प्रवाशांची अडवणूक आणि चालक-प्रवासी यांच्यातील वाद यांवर तोडगा काढण्यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे.
तक्रारदार महिलांची नावे गोपनीय ठेवणार
या संपूर्ण प्रकरणात महिला प्रवाशांनी भीतीपोटी तक्रार करण्याचे टाळू नये यावर डॉ.नीलम गोऱ्हे यांनी विशेष भर दिला आहे. तक्रारदार महिलांची नावे गोपनीय ठेवली जातील आणि त्यांच्या तक्रारींच्या निवारणासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
रात्रीच्या वेळी महिला प्रवाशांना वाहनातून उतरवणे ही त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने गंभीर बाब आहे.महिलांनी न घाबरता आपल्या तक्रारी लेखी स्वरूपात द्याव्यात. तक्रारदार महिलांची नावे गोपनीय ठेवली जातील आणि त्यांच्या तक्रारींच्या निवारणासाठी प्रयत्न केले जातील,असे आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.
प्रवाशांच्या हक्कांसाठी तक्रार महत्त्वाची
ॲपवर बुकिंग करताना दिसणारे भाडे, प्रत्यक्ष प्रवासाच्या वेळी होणारी मागणी आणि चालकाचे वर्तन याबाबत काही तफावत किंवा वाद निर्माण झाल्यास त्याची नोंद ठेवणे महत्त्वाचे आहे.स्क्रीनशॉट आणि बुकिंगची माहिती जतन करून संबंधित यंत्रणेकडे तक्रार केल्यास प्रकरणाची पडताळणी करण्यास मदत होऊ शकते.
ॲपआधारित वाहनसेवा वापरणाऱ्या प्रवाशांना सुरक्षित, पारदर्शक आणि सन्मानपूर्वक सेवा मिळावी, यासाठी तक्रारींची दखल घेणे आणि त्यावर योग्य कार्यवाही करणे आवश्यक आहे. आता डॉ. गोऱ्हे यांच्या पुढाकारानंतर संबंधित परिवहन यंत्रणा आणि कंपन्या या तक्रारींवर कोणती पावले उचलतात, याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.
