Tuesday, October 27

दृष्टिदिव्यांग विद्यार्थ्यांच्या कलेला द्या साथ,अवघ्या ५० रुपयांत खरेदी करा आकर्षक मेणपणत्या; स्वावलंबनाच्या दिशेने उजळवा आशेचा दीप

IMG_20261023_213154


दिवाळी म्हटली की घराची सजावट, रोषणाई आणि भेटवस्तूंची खरेदी आलीच.मात्र यंदाच्या दिवाळीत खरेदीसोबत सामाजिक बांधिलकी जपण्याची संधी पंढरपूरकरांना मिळाली आहे.दृष्टिदिव्यांग विद्यार्थ्यांनी स्वतःच्या मेहनतीतून तयार केलेल्या मेणपणत्यांच्या दहा नगांच्या एका पाकिटाची किंमत केवळ ५० रुपये ठेवण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तू खरेदी केल्याने त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळेल, त्यांच्या कौशल्याला बाजारपेठ उपलब्ध होईल आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल. त्यामुळे ही केवळ दिवाळीच्या सजावटीसाठी केलेली खरेदी नसून विद्यार्थ्यांच्या स्वावलंबनासाठी उचललेले महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.

विद्यार्थ्यांनी पारंपरिक पद्धतीच्या मेणपणत्यांबरोबरच आधुनिक सजावटीला साजेशा विविध आकारांच्या मेणबत्त्या तयार केल्या आहेत. यामध्ये डोअर शेप, हार्ट शेप, टेडी शेप, बटरफ्लाय शेप, रोझ शेप, हार्ट कॅण्डल, डबी कॅण्डल, राऊंड कॅण्डल डबी आणि कपल कॅण्डल अशा आकर्षक प्रकारांचा समावेश आहे.

या मेणबत्त्या दिवाळीतील घरगुती सजावट,हॉटेल,रेस्टॉरंट, कॅण्डललाइट डिनर तसेच विविध व्यावसायिक उपयोगांसाठी उपयुक्त आहेत. इतर प्रकारच्या मेणबत्त्यांचे दर त्यांच्या आकारानुसार आणि प्रकारानुसार निश्चित करण्यात आले आहेत.

IMG_20261023_213235


दृष्टिदिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच व्यावसायिक कौशल्याचे प्रशिक्षण मिळावे, त्यांनी स्वतःच्या क्षमतेची ओळख करून घेत भविष्यात आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावे, या उद्देशाने शाळेत विविध उपक्रम राबविले जातात.

या मेणपणत्या तयार करण्याच्या उपक्रमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव, सर्जनशीलतेला वाव आणि उत्पादननिर्मितीची ओळख मिळते. त्यांच्या हातून तयार झालेल्या वस्तूंना ग्राहकांची पसंती मिळाल्यास अशा उपक्रमांना अधिक प्रोत्साहन मिळू शकते.

या उपक्रमासाठी शाळेच्या कला शिक्षिका सौ.अश्विनी माने यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विशेष शिक्षक महेश म्हेत्रे,सौ.उमा कुलकर्णी, सौ.रोहिणी घोडके, साधना गिरी तसेच इतर कर्मचाऱ्यांनीही महत्त्वपूर्ण सहकार्य केले.

संस्थेचे अध्यक्ष मुन्नागिर गोसावी यांनी नागरिक, व्यापारी, हॉटेल व्यावसायिक, सामाजिक संस्था आणि दानशूर व्यक्तींना विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या मेणपणत्या व मेणबत्त्या खरेदी करण्याचे आवाहन केले आहे.

दिवाळीच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात सजावटीच्या वस्तू खरेदी केल्या जातात.अशा वेळी दृष्टिदिव्यांग विद्यार्थ्यांच्या हातून तयार झालेल्या वस्तूंना प्राधान्य दिल्यास त्यांच्या कष्टांना योग्य दाद मिळेल.त्याचबरोबर कौशल्याधारित शिक्षण, रोजगाराभिमुख प्रशिक्षण आणि स्वावलंबनाच्या प्रयत्नांना प्रोत्साहन मिळेल.

IMG_20261023_213110


दृष्टिदिव्यांग विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या मेणपणत्या व मेणबत्त्या खरेदी करण्यासाठी खालील प्रतिनिधींशी संपर्क साधावा, असे शाळेच्या वतीने कळविण्यात आले आहे.

संतोष बारहाते,प्रभारी मुख्याध्यापक — ९९२२९३८५८६
अनिल कुंभार — ९९२२५२८८८४
सुनील व्यवहारे — ७०२०६५८९२२

दृष्टिदिव्यांग विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या या मेणपणत्या केवळ प्रकाश देणाऱ्या वस्तू नाहीत, तर मेहनत,जिद्द,कल्पकता आणि स्वावलंबनाची प्रेरणा देणाऱ्या कलाकृती आहेत.त्यांच्या हातातील कौशल्याला बाजारपेठ मिळाली तर त्यांच्यासाठी आत्मविश्वासाच्या आणि प्रगतीच्या नव्या वाटा खुल्या होऊ शकतात.

यंदाच्या दिवाळीत सजावटीसोबत संवेदनशीलतेचाही प्रकाश पसरवूया. दृष्टिदिव्यांग विद्यार्थ्यांच्या हातून साकारलेल्या मेणपणत्या खरेदी करूया आणि त्यांच्या स्वावलंबनाचा दीप उजळवूया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *