
मोडनिंबमध्ये पर्युषण पर्वाची भक्तिमय सांगता;पालखी सोहळ्याने रंगला धार्मिक उत्साह
दहा दिवसांच्या धार्मिक साधनेनंतर पर्युषण पर्वाचा समारोप; मोडनिंब मध्ये क्षमावलीसह पालखी सोहळा
मोडनिंब येथील श्री १००८ मुनीसुव्रतनाथ दिगंबर जैन मंदिरात दहा दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांनी पर्युषण पर्व साजरे करण्यात आले. पालखी सोहळा आणि क्षमावलीने पर्वाची भक्तिमय सांगता झाली.

मोडनिंब | ज्ञानप्रवाह न्यूज :महाराष्ट्रातील प्रथम चतुर्मुख अतिशय क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील मोडनिंब येथील श्री १००८ मुनीसुव्रतनाथ दिगंबर जैन मंदिरात पर्युषण पर्वाची सांगता मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पालखी सोहळ्याने करण्यात आली.
पर्युषण पर्वानिमित्त मंदिर परिसरात सलग दहा दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.जयपूर येथील जीत भैय्या शास्त्री यांच्या उपस्थितीत नित्य अभिषेक,पंचमेरू पूजन, धर्मप्रभावना,प्रवचन,विद्यार्थी पाठशाळा तसेच तत्त्वार्थ सूत्र वाचन अशा विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
सायंकाळच्या आरतीनंतर धार्मिक खेळांच्या माध्यमातून जनजागृती आणि धर्मप्रभावनेचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.धार्मिक कार्यक्रमांमधून भगवान महावीरांच्या विचारांचा, जैन धर्मातील तत्त्वांचा आणि आत्मशुद्धीच्या संदेशाचा जागर करण्यात आला.

पर्युषण पर्वाच्या दहा दिवसांच्या कालावधीत महिला व पुरुष श्रावक-श्राविकांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग घेतला. यावेळी १० श्रावक व श्राविकांनी सलग दहा दिवस एकासण करून धार्मिक साधना केली.भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत धर्मप्रभावनेत योगदान दिले.
पालखी सोहळ्याने सांगता
पर्युषण पर्वाच्या सांगतेनिमित्त मंदिरातून भक्तिमय वातावरणात पालखी सोहळा काढण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने धर्मबांधव सहभागी झाले.पर्वाच्या सांगतेवेळी सर्व धर्मबांधवांनी क्षमावली मागून मनातील राग,द्वेष व कटुता दूर करण्याचा संदेश दिला आणि धार्मिक पर्वाची सांगता केली.

आयोजकांचे आभार
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विशाल मेहता,उपाध्यक्ष अरविंद गुरसाळकर तसेच सुनील पुरवत,बाहुबली मेहता,सुदर्शन मेहता,सुहास दोशी, अतुल खडके, निलेश गुरसाळकर, शैलेश दोशी,अरुण कळसकर, विजयकुमार मेहता,रत्नदीप मेहता, अजित खडके,रविकांत शहा,संजय शहा,परिमल दोशी,राहुल बाभळे, बाहुबली दोभाडा,रोहित गांधी,यश गांधी आणि शाश्वत दोभाडा यांनी प्रयत्न केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजना साठी सहकार्य करणाऱ्या सर्व धर्मबांधवांचे संस्थेच्यावतीने आभार मानण्यात आले.
