Tuesday, October 27

दुष्काळग्रस्त ४५ गावांमध्ये जनावरांसाठी आठ दिवसांत चारा व पाणी उपलब्ध करून द्यावे; अन्यथा रास्ता रोको आंदोलन

मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागात दुष्काळाची तीव्रता वाढली असून अनेक गावांमध्ये जनावरां साठी चारा उपलब्ध होणे कठीण झाले आहे. मागील तीन ते चार महिन्यांपासून पशुपालक शेतकरी जनावरांना जगवण्यासाठी विकतचा चारा आणत आहेत. मात्र, सतत चारा खरेदी करण्याची आर्थिक क्षमता आता संपत चालली असल्याचे शेतकऱ्यांनी निवेदनात नमूद केले आहे.

शासनाने दुष्काळ जाहीर केला असला तरी दुष्काळी उपाय योजनांचा प्रत्यक्ष लाभ पशुपालकां पर्यंत पोहोचत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. जनावरां साठी चारा आणि पाण्याची तातडीने व्यवस्था करणे आवश्यक असताना संबंधित गावांमध्ये अद्याप पुरेसा पुरवठा झालेला नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

IMG_20261015_132134


प्रशासनाकडून अद्याप ८० दिवसांचा चारा शिल्लक असल्याचे सांगितले जात असल्याचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे. मात्र ज्या गावांमध्ये चारा संपला आहे, त्या गावांची प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुस्थिती तपासावी आणि तातडीने चारा उपलब्ध करून द्यावा,अशी मागणी दूध उत्पादकांनी केली आहे.

जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांनी दुष्काळग्रस्त ४५ गावांना प्रत्यक्ष भेट देऊन चाऱ्याच्या उपलब्धतेची खातरजमा करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

शासनाने पुढील आठ दिवसांत जनावरांसाठी चारा आणि पाण्याची व्यवस्था करावी. अन्यथा मंगळवेढा तालुक्यातील पशुपालक शेतकऱ्यांच्यावतीने भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

चारा आणि पाणी उपलब्ध न झाल्यास दुष्काळाची तीव्रता असलेल्या ४५ गावांतील शेतकरी आपल्या जनावरांसह स्थलांतर करण्यास बाध्य होऊ शकतात. त्यामुळे शासन आणि प्रशासनाने या गंभीर परिस्थितीची तातडीने दखल घ्यावी, असे शेतकऱ्यांनी म्हटले आहे.

कृषिभूषण अंकुश पडवळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात अशोक लेंडवे, औदुंबर गायकवाड, दामाजी सलगर, श्रीपती चौगुले, शहाजान पटेल, आबासाहेब पाटील, संजय काकडे, राजश्री जगदाळे, यशवंत सलगर आणि राहुल चौगुले यांच्यासह इतर प्रतिनिधी उपस्थित होते.यावेळी १,३५० शेतकऱ्यांच्या सह्यांचे निवेदन प्रशासनाकडे सादर करण्यात आले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *