Tuesday, October 27

डोंबिवलीच्या नवरात्रोत्सवा तून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात; एकनाथ शिंदेंकडून दिवाळी शिध्याचे ट्रक पाठविण्याची घोषणा


डोंबिवलीत डॉ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि श्री नवदुर्गा युवा मंडळाच्या साधेपणाने साजऱ्या होणाऱ्या नवरात्रोत्सवाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौतुक केले. दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी दिवाळीचा शिधा पाठविण्याची घोषणा; उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकीचा संदेश

IMG_20261018_165831


नवरात्रोत्सव म्हणजे भक्ती,उत्साह, सांस्कृतिक कार्यक्रम आणि जल्लोष.मात्र राज्यातील अनेक भागांत शेतकरी दुष्काळाच्या संकटाचा सामना करत असताना उत्सव साजरा करण्याची पद्धतही सामाजिक परिस्थितीशी जोडली पाहिजे, असा संदेश या उपक्रमातून देण्यात येत आहे.

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त परिस्थितीचा विचार करून यंदा नवरात्रोत्सवातील अनावश्यक खर्च टाळण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आहे.भव्य सजावट आणि खर्चिक कार्यक्रमांऐवजी भक्ती, संगीत,भजन आणि सांस्कृतिक उपक्रमांना प्राधान्य देण्यात आले आहे. या उत्सवातून बचत होणारा निधी दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या मदतीसाठी समर्पित करण्याचा आयोजकांचा संकल्प आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या उपक्रमाची दखल घेत आयोजकांचे कौतुक केले.संकटाच्या काळात शेतकरी बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

दुष्काळामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकरी कुटुंबांना दिवाळीचा सण साजरा करता यावा, या उद्देशाने एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्याच्या दिवशी दिवाळीचा शिधा घेऊन जाणारे ट्रक रवाना करण्याची घोषणा केली.

दिवाळी हा आनंदाचा आणि कुटुंबासोबत सण साजरा करण्याचा काळ असतो मात्र दुष्काळामुळे शेतकरी कुटुंबांसमोर दैनंदिन गरजांचा प्रश्न निर्माण होतो.अशा परिस्थितीत त्यांच्यापर्यंत मदतीचा हात पोहोचविण्याचा हा उपक्रम महत्त्वाचा ठरत आहे.

नवरात्रोत्सवातील भजनसंध्येला कोकणातील विविध भजन मंडळांनी पारंपरिक भजनांचे सादरीकरण केले.भक्तिरसाने भारलेल्या या कार्यक्रमात उपस्थित भाविकांनी भक्ती आणि संस्कृतीचा अनुभव घेतला.

याचवेळी दुष्काळग्रस्त बळीराजाच्या जीवनातील संकटे दूर व्हावीत, त्याच्या कुटुंबात सुख- समृद्धी नांदावी आणि शेतीला पुन्हा चांगले दिवस यावेत यासाठी देवीच्या चरणी मालवणी भाषेत गाऱ्हाणे घालण्यात आले.परंपरेचा सन्मान राखत शेतकऱ्यांच्या वेदनांना वाचा फोडण्याचा हा भावनिक प्रयत्न उपस्थितांचे लक्ष वेधून घेणारा ठरला.

या सामाजिक उपक्रमाला स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांनीही प्रतिसाद दिला. शिवसेनेच्या स्थानिक नगरसेवकांनी,पदाधिकाऱ्यांनी आणि मान्यवरांनी शेतकरी मदतनिधीसाठी धनादेश सुपूर्द करून या कार्याला हातभार लावला.

यावेळी आमदार राजेश मोरे, महापौर हर्षाली चौधरी,शिवसेनेचे राज्य संघटन प्रमुख आनंद परांजपे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, आयुक्त अभिनव गोयल यांच्यासह स्थानिक नगरसेवक,पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

IMG_20261018_165751


धार्मिक उत्सवांचे महत्त्व केवळ रोषणाई, सजावट किंवा गर्दीपुरते मर्यादित नसते. समाजातील गरजू घटकांच्या मदतीसाठी उत्सवाचा उपयोग केला तर त्यातून सामाजिक एकोपा आणि संवेदनशीलतेची भावना अधिक दृढ होऊ शकते.

डोंबिवलीतील या नवरात्रोत्सवाने भक्ती, सांस्कृतिक परंपरा आणि सामाजिक उत्तरदायित्व यांची सांगड घालण्याचा प्रयत्न केला आहे. दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या मदतीसाठी बचत निधी समर्पित करण्याचा संकल्प आणि दिवाळी शिधा पाठविण्याची घोषणा यामुळे या उपक्रमाला सामाजिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

बळीराजा संकटात असताना त्याच्या पाठीशी उभे राहणे, हीच खरी सामाजिक बांधिलकी. भक्तीच्या माध्यमातून मदतीचा हात पुढे करणारा हा उपक्रम उत्सव साजरा करण्याच्या सामाजिक भानाची जाणीव करून देतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *