
मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला गती द्या; मार्च २०२७ पूर्वी पाणी सुरू करण्याचे आमदार आवताडे यांचे निर्देश
पहिल्या टप्प्यातील १११ कोटी, दुसऱ्या टप्प्यातील ७८ कोटी ४३ लाखांच्या कामांचा आढावा; तिसऱ्या टप्प्याच्या निविदा प्रक्रियेलाही वेग देण्याच्या सूचना
मंगळवेढा | ज्ञानप्रवाह न्यूज:मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या कामांना गती देण्याचे निर्देश आमदार समाधान आवताडे यांनी दिले आहेत.योजनेच्या संबंधित अधिकाऱ्यांसमवेत आयोजित आढावा बैठकीत त्यांनी कामातील अडथळ्यांचा आढावा घेतला. पहिल्या टप्प्यातील पंप हाऊस, मुख्य उर्ध्वगामी नलिका आणि वितरण व्यवस्थेची अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करावीत. दुसऱ्या टप्प्यातील कामांचे नियोजन करून मार्च २०२७ पूर्वी पाणी सोडण्याच्या दृष्टीने युद्ध पातळीवर प्रयत्न करावेत,अशा स्पष्ट सूचना त्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.
पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील कामे तातडीने पूर्ण करा
मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या पहिल्या टप्प्यात सुमारे १११ कोटी रुपयांची कामे प्रस्तावित आहेत. यामध्ये पंप हाऊसचे बांधकाम, उर्ध्वगामी नलिका क्रमांक एकचे काम सुरू करणे आणि शेलेवाडी येथे वितरण कुंड तयार करणे यांसारख्या महत्त्वाच्या कामांचा समावेश आहे.
या कामांमध्ये कोणताही विलंब होऊ नये यासाठी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष कामावर लक्ष केंद्रित करावे. प्रत्येक कामाचे दिवसनिहाय नियोजन करून अपूर्ण कामे निर्धारित वेळेत पूर्ण करावीत, असे आमदार समाधान आवताडे यांनी सांगितले.
दुसऱ्या टप्प्यासाठी सुमारे ७८ कोटी ४३ लाख रुपयांची कामे हाती घेण्यात आली आहेत.यामध्ये दुसऱ्या टप्प्यातील पंपगृह,संरक्षक भिंत,बॅलन्सिंग टँक,लेंडवे चिंचाळे येथील उर्ध्वगामी नलिका क्रमांक दोन,मुख्य गुरुत्वीय नलिका आणि त्यावरील वितरण व्यवस्थेची कामे समाविष्ट आहेत.
या सर्व कामांचे योग्य नियोजन करून दुसऱ्या टप्प्यापर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी आवश्यक कार्यवाही वेगाने करावी,असे निर्देश त्यांनी दिले.
गुंजेगाव येथील अडथळे दूर करण्याच्या सूचना
गुंजेगाव येथील पंप हाऊसच्या कामात निर्माण झालेल्या अडथळ्यां बाबत आमदार समाधान आवताडे यांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांना आवश्यक सूचना दिल्या आहेत.संबंधित विभागांनी समन्वय साधून या अडचणी तातडीने दूर कराव्यात जेणेकरून बांधकामाचे काम रखडणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
सिंचन योजनेच्या कामात प्रशासकीय अडचणी किंवा जमीन मोजणीसंबंधी प्रश्नांमुळे विलंब होऊ नये,यासाठी संबंधित विभागांनी तातडीने निर्णय घेऊन कार्यवाही करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
तिसऱ्या टप्प्याच्या निविदा प्रक्रियेलाही गती
योजनेच्या तिसऱ्या टप्प्यातील कामांची निविदा प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचनाही आमदार आवताडे यांनी दिल्या. या टप्प्यात काही ठिकाणी हस्तांतरणा संबंधी बाबी अद्याप अपूर्ण आहेत. संबंधित ठिकाणांची मोजणी तातडीने करून देण्याबाबत जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांना बैठकीत सूचना करण्यात आल्या.
तिसऱ्या टप्प्यातील प्रशासकीय प्रक्रिया वेळेत पूर्ण झाल्यास पुढील कामांचे नियोजन करणे सुलभ होईल.त्यामुळे सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करून योजनेच्या प्रगतीतील अडथळे दूर करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
पाच वर्षांची देखभाल आणि पाणी वापर संस्थांचे हस्तांतरण
दुसऱ्या टप्प्यात योजना कार्यान्वित करण्याबरोबरच पाच वर्षांचे परिचलन,देखभाल व दुरुस्ती करण्याची तरतूद आहे.तसेच शेतकऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण देणे,पाणी वापर संस्थांची स्थापना करणे आणि संपूर्ण वितरण व्यवस्था संबंधित संस्थांकडे हस्तांतरित करणे या बाबींचाही समावेश आहे.यामुळे केवळ पाणी उपलब्ध करून देणेच नव्हे तर सिंचन व्यवस्थेचे दीर्घकालीन आणि योग्य पद्धतीने व्यवस्थापन करण्यावरही भर दिला जाणार आहे.
उन्हाळ्यात शेतकऱ्यांना पाणी देण्याचे नियोजन
मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यां साठी ही सिंचन योजना महत्त्वाची असून या योजनेचे काम वेळेत पूर्ण झाल्यास शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील कामे प्राधान्याने पूर्ण करून यंदाच्या उन्हाळ्यात योजना कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे आमदार समाधान आवताडे यांनी सांगितले.
योजनेची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांनी वैयक्तिक लक्ष द्यावे, प्रलंबित बाबींचा तातडीने निपटारा करावा आणि कामाच्या प्रगतीचा नियमित आढावा घ्यावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
बैठकीला अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित
या आढावा बैठकीला अधीक्षक अभियंता धीरज साळे, कार्यकारी अभियंता मुन्नोळी,डेप्युटी इंजिनीअर दुधाळ,जिल्हा परिषद सदस्य प्रदीप खांडेकर,करुणा शिवशरण, जनार्दन शिवशरण, उपनगराध्यक्ष येताळा भगत, बाळासाहेब ताड आणि अंकुश पडवळे यांच्यासह संबंधित अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
आता लक्ष अंमलबजावणीकडे
मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील कामांना गती देण्याचे निर्देश देण्यात आले असले, तरी मार्च २०२७ पूर्वी प्रत्यक्ष पाणी उपलब्ध होण्यासाठी अपूर्ण बांधकामे,प्रशासकीय अडथळे आणि वितरण व्यवस्थेची कामे वेळेत पूर्ण होणे महत्त्वाचे ठरणार आहे.त्यामुळे आगामी काळात या योजनेच्या प्रत्यक्ष प्रगतीकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
