
सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई; आळगी येथील ऊसाच्या शेतातून २११ किलो गांजा जप्त,६० वर्षीय व्यक्तीविरुद्ध गुन्हा
अक्कलकोटच्या आळगी येथे ऊसाच्या शेतातून २११ किलो १०० ग्रॅम गांजा जप्त. २४० झाडांची लागवड उघड; मुद्देमालाची किंमत १ कोटी ५ लाख ५५ हजार रुपये.
अक्कलकोट|ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२९ सप्टेंबर २०२६ :सोलापूर जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत अक्कलकोट दक्षिण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मौजे आळगी, ता. अक्कलकोट येथील एका शेतकऱ्याच्या ऊसाच्या शेतात लागवड केलेली गांजाची २४० झाडे पोलिसांनी जप्त केली आहेत. जप्त केलेल्या मुद्देमालाचे एकूण वजन २११ किलो १०० ग्रॅम असून त्याची अंदाजे किंमत १ कोटी ५ लाख ५५ हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.ही कारवाई २८ सप्टेंबर २०२६ रोजी करण्यात आली.
गोपनीय माहितीवरून पोलिसांची धडक कारवाई
सोलापूर जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात विशेष मोहीम राबविण्याचे आदेश पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी (भा.पो.से.) आणि अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांनी सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना दिले होते.
त्यानुसार अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत बधे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाची नियुक्ती केली होती.
२८ सप्टेंबर रोजी हे पथक अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील करजगी दुरक्षेत्र परिसरात पेट्रोलिंग करत असताना गोपनीय बातमीदारामार्फत आळगी गावातील एका शेतात ऊसाच्या पिकामध्ये गांजासदृश वनस्पतींची लागवड केल्याची माहिती मिळाली.

मिळालेली माहिती पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र टाकणे यांना दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी संबंधित शेतात छापा टाकून पाहणी केली.
ऊसाच्या शेतात १२ फुटांपर्यंत गांजाची झाडे
पोलिसांनी आळगी येथील मलप्पा गुरुबाळप्पा गड्डी उर्फ बिराजदार (वय ६०, रा. शेगाव, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर) यांच्या ऊसाच्या शेताची पाहणी केली. यावेळी ऊसाच्या पिकामध्ये ठिकठिकाणी अंदाजे १२ फूट उंचीची गांजाची झाडे आढळून आली.
पंचनाम्याची प्रक्रिया करून पोलिसांनी एकूण २४० गांजाची झाडे जप्त केली. यामध्ये २१० जिवंत झाडे आणि ३० वाळलेली झाडे असल्याचे पोलिसांनी सांगितले.जप्त केलेल्या वनस्पतींचे वजन केले असता ते २११ किलो १०० ग्रॅम इतके भरले. या मुद्देमालाची अंदाजे बाजारातील किंमत १ कोटी ५ लाख ५५ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल
या प्रकरणी अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५३१/२०२६ नुसार अंमली पदार्थ व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम, १९८५ (NDPS Act) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत बधे करीत आहेत.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र टाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत बधे, पोलीस उपनिरीक्षक राजशेखर निंबाळे तसेच पोलीस अंमलदार मोसलगी, चिंचोळकर,कोळी, धुमाळ,डोंगरीतोट,हडपद,धनगर, सुर्यवंशी, पाटील, बिराजदार, अन्सारी, शिंदे, पवार, माने आणि कोले यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
अंमली पदार्थांची लागवड, विक्री आणि तस्करीविरोधात पोलिसां कडून कारवाई सुरू असून आळगी येथील ही कारवाई त्याच मोहिमेचा भाग असल्याचे पोलिसांनी सांगितले.
